विहिरीत पोहल्याने मातंग समाजाच्या मुलांची काढली नग्न धिंड

जळगाव : येथील जामनेर तालुक्यात मालकाच्या शेतातील विहिरीत पोहल्याने बारा ते पंधरा वर्षे वयोगटाच्या मातंग समाजाच्या दोघांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलांना कमरेचा पट्टा तसेच काठीने अमानुष मारहाणही करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली. मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं ही अमानुष मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे . मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाण करणारा व्यक्ती त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून पट्ट्यानं जबर मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे ही दोघं मुलं कामाला असल्याचं सांगण्यात येते. लहूजी साळवे संघर्ष समितीनं या घटनेचा तीव्र निषेध करत अॅट्रोसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मारहाणीबाबत पहुर पोलिसांकडे अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. तर तक्रार आल्यास चौकशी करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.\

या प्रकरणी काही राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया :-

ही मारहाण विकृत मनोवृत्तीचं दर्शन, जातीपातीच्या दृष्टीकोनातून पाहू नका – चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री, महाराष्ट्र

दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री

मानवतेला काळिमा फासणारी घटना – जिग्नेश मेवानी, दलित नेते

मानसिक विकृतीतून कृत्य – एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते