घर दाखविण्याच्या बहाण्याने विवाहितेवर मित्राचा बलात्कार; बनविली अश्लील क्लिप

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील ३२ वर्षीय विवाहितेवर तिच्याच मित्राने घर दाखविण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची व घटनेचे मोबाईलवर छायाचित्रण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घर दाखविण्याची थाप मारत असलेल्या मित्राने विवाहितेवर बलात्कार करून घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास मोबाइलवरची क्लिप तिच्या पतीला दाखविण्याची धमकी दिली. राहुल घुगे असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरातील ३२ वर्षीय पीडित महिला ही शेंद्रा येथील एका कंपनीत कामाला होती. या दरम्यान राहुल घुगे याच्या सोबत पीडितेची मैत्री झाली. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री राहुलने माझे नवीन घर पाहण्यासाठी चल, असे म्हणून पीडितेला दुचाकीवरुन जाधववाडी येथे नेले. तेथे पोहोचताच त्याने बळजबरी करीत पीडितेवर बलात्कार करुन त्याचे मोबईलवर छायाचित्रण केले. त्यानंतर या बाबत कुणाला काही सांगितल्यास ही क्लिप तुझ्या पतीला दाखवेल, अशी धमकी देत वारंवार बलात्कार केला.

राहुलच्या त्रासाला कंटाळून पीडिता ही परगावी गेली होती. मात्र राहुलने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेला शहरात परत बोलविले. याबाबत पीडितेच्या पतीला माहिती झाल्याने दोघांचा घटस्फोट देखील झाला. त्यानंतर पीडिता ही राहुलसोबत एका खोलीत राहू लागली. मात्र राहुलने काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. राहुलने आपल्याला फसवल्याचे लक्षात येताच पीडितेने हर्सूल पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.