मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेपासून रोखणार

पंढरपूर : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न गेल्या तीन वर्षांपासून ऐरणीवर असून, राज्य सरकारकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेकरिता पंढरीत येणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेपासून रोखण्याचे नियोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येत्या सोमवार दि. 16 रोजी पंढरीत मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आषाढी यात्रेतील आंदोलनाची दिशा निश्‍चित करण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्ताने शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 22 जुलै रोजी पंढरपुरात येणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्र्याना शासकीय महापूजेपासून रोखण्यात येणार आहे. लाखो वारकर्‍यांच्या गर्दीत गनिमी काव्याने हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती असून, त्या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी येत्या 16 जुलै रोजी पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. विक्रमी संख्येचे 57 मोर्चे शांततेत काढल्यानंतरही राज्य सरकार आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेत नसल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आता आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जूनमध्ये तुळजापूर येथे जागर गोंधळ आंदोलन करून राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर आता पंढरपुरात आंदोलन करण्याचे नियोजन केले जात आहे.