‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी लावला ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’चा नारा

नवी दिल्ली: गांधी जयंतीनिमित्त दरवर्षी जनतेला खादी कपड्यांचा वापर करा, असे आवाहन करत ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’चा नारा आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात लावत जनतेला संबोधले .

त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. यावर्षी १७ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी दिल्लीतील खादी ग्रामोद्योग भांडारमध्ये १ कोटी २० लाख रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. ही समाधानाची बाब आहे. दिवाळीदरम्यान खादी गिफ्ट कूपनच्या विक्रीत जवळपास ६८० टक्क्यांची वाढ झाली आहे. खादी आणि हस्तकलेच्या वस्तूंच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ९० टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी ‘खादी फॉर नेशन’ होते आणि मी ‘खादी फॉर फॅशन’ म्हणालो होतो. मात्र, आता त्याची जागा ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ने घेतली आहे, असेही मोदी म्हणाले.

‘मन की बात’ च्या ३७ व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. छठ पर्व हा शुद्धीचा पर्व असल्याचे ते म्हणाले.

जवानांबरोबर दिवाळी साजरी करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगत जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्यांचा अनुभव सर्वांनी जरूर जाणून घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की, आपले जवान फक्त सीमेवरच नव्हे तर जगात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहेत. आपले जवान दुर्गम भागात जातात. यात अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

‘मन की बात’ या कार्यक्रमावर अनेकदा कौतुकाचा वर्षाव होतो आणि टीकाही होते. मात्र, त्याचा एकंदरीत परिणाम पाहून आत्मविश्वास वृद्धींगत होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आजच्या ‘मन की बात’मध्ये त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी, सिस्टर निवेदिता यांच्यासह अनेक महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला.