जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनण्याची महाराष्ट्राची क्षमता – डॉ. व्यास

मुंबई : पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांची उत्तम दर्जाची कार्यक्षमता, भांडवल, कार्यशक्ती असल्याने भारत जागतिक दर्जाचे रोगाचे निदान करणारा देश ठरत आहे. शहर ते ग्रामीण भागातील आरोग्य सेवा जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. सर्व रूग्णालयाची माहिती एकाच व्यासपीठावर देश तसेच विदेशातील नागरिकांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांनी सांगितले.

सेवा क्षेत्राविषयक जागतिक प्रदर्शनात आधुनिक आरोग्य निगा- मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ व्यास बोलत होते.

डॉ. व्यास म्हणाले, विदेशातून येणाऱ्या रूग्णांना रोगाचे निदान कोणत्या रूग्णालयात होते. त्यासाठीचे वैद्यकीय शुल्क किती या सर्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील रूग्णालय अधिक कार्यक्षम असणे यासाठी त्यांवर नियमात्मक बंधणे असणार आहेत.

विविध देशातून लोक भारतात रोगाचे निदान करण्यासाठी येतात. अॅलोपॅथी, होमिओपॅथी , युनानीची केंद्रे आहेत. महाराष्ट्रात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 25 खासगी महाविद्यालये आहेत. शहर ते ग्रामीण भागात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. शासनातर्फे विविध विमा योजना आणि आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत. विमा योजनेअंतर्गत दीड कोटीपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटत असून, आदिवासी आणि अल्पसंख्याकांसाठीही शासन योजना राबवित आहे. असे सांगत डॉ. व्यास म्हणाले, काही वर्षापूर्वी मोठ्या रोगाचे निदान फक्त विदेशात व्हायचे, पण ही परिस्थ‍िती बदलली असून महाराष्ट्राकडेही आरोग्याच्या निदान करणाऱ्या सुविधा असून कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी आहेत. यामुळे महाराष्ट्र लवकरच जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनणार आहे.