खुशखबर ! राज्य सरकार दोन वर्षात करणार ७२ हजार पदांची भरती

मुंबई : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दोन वर्षांमध्ये राज्य शासनातील 72 हजार जागा भरणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे.

राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सर्व पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. शेतीच्या शाश्वत विकासासह शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने विविध महत्त्वाकांक्षी योजना, अभियान आणि उपक्रमांची गतीने अंमलबजावणी सुरू केली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रयत्नांच्या यशस्वीतेवर संबंधित विभागांमधील रिक्त पदांमुळे प्रतिकूल परिणाम होत होता. तसेच ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.