मधुर भंडारकरच्या या चित्रपटचा येतोय सिक्वेल

madhur bhandarkar

तब्बल १७ वर्षानंतर दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचा ‘चांदणी बार’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चांदणी बार हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते. मधुर भंडारकर आता या चित्रपटाचा सिक्वल बनवत असून या चित्रपटाची निर्मिती शैलेश सिंग करणार आहेत.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या माहितीनुसार, २००५ नंतर डान्स बार बंद करण्यात आले होते. या चित्रपटाचा प्रवास देखील त्या काळावर प्रकाश टाकणार आहे, असं सांगण्यात येत आहे. या विषयासाठी भंडारकर यांची पूर्ण तयारी झाली असून त्यांनी चित्रपटाच्या कथानकाचे लेखनही सुरू केले आहे. चित्रपटाच्या कथेवर काम पूर्ण झाल्यानंतर यातल्या कलाकारांची निवड करण्यात येईल आणि वर्षाअखेरपर्यंत चित्रपटाची प्रक्रिया सुरू होईल.

‘चांदनी बार’ मध्ये तब्बूने मुख्य भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील पटकावला होता. याशिवाय अतुल कुलकर्णीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, अनन्या खरेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता मधुर भंडारकरचा ‘चांदणी बार’ सिक्वेल कोणते आणि किती पुरस्कार मिळवेल हे तर चित्रपट आल्यावरच कळेल.