लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांना घर भेट

मुंबई : लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांना संघवी पार्श्व ग्रुप आणि सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशन यांनी संयुक्त पणे मुंबई-नाशिक द्रुतगती मार्गावरील आडगाव येथील संघवी गोल्डन सिटी या परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पात निःशुल्क घर भेट दिले आहे. काल मुंबईत झा लेल्या सोहळ्यात अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या हस्ते स्वाती महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ही घोषणा करण्यात आली.

सत्काराला उत्तर देतांना स्वाती महाडिक म्हणाल्या की , माझा सत्कार करायची अनेकांना इच्छा असते. अनेक जण मला मुलाखतीसाठी बोलावतात. त्यांना मी एवढेच सांगेन की माझी नोकरी फक्त १४ वर्षांसाठी आहे. पती लष्करात होते तेव्हा मी वेगळी नोकरी करीत होते. हा पूर्ण भिन्न असा पेशा आहे. त्यामुळे मला खूप काही शिकायचे आहे. त्यातील सहा महिने आता पूर्ण झाले आहेत. फक्त साडेतेरा वर्षे उरलीत आहेत. आता कुठे माझा शिकण्याचा काळ सुरू झाला आहे. दिवसाचे २४ तासही शिकण्यासाठी कमी पडतात.

देशसेवा करतानाच मुलांकडे लक्ष द्यायचे, त्यांना शिकवायचे, सिंगल पॅरेंटस् म्हणून त्यांना वाढवायचे. सैन्यात जाऊन नवा जन्म मिळाला असे त्यांनी सांगितले.अनेक प्रकल्पांना चालना आणि नवा उत्साह ‘आमच्यासाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे. इतक्या वर्षांत कठोर परिश्रमांद्वारे साध्य केलेली ब्रँडची परंपरा व विश्वास संघवी पार्श्वच्या माध्यमातून पुढेही कायम ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे’ संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश संघवी यांनी सांगितले. आम्ही आमच्या ब्रँडला नवी ओळख दिली आहे आणि नावीन्यपूर्ण व ताजेतवाने राहण्यासाठी कंपनीला नवी चेतना दिली आहे. आमच्या नव्या ओळखीमुळे भविष्यातील आमच्या अनेक प्रकल्पांना चालना आणि नवा उत्साह मिळेल असे ते म्हणाले.

सीमा संघवी वेल्फेअर फाउंडेशनने हाती घेतलेल्या कामाचा मला अभिमान वाटतो. महाडिक यांच्या शौर्याला सलाम करायला हवा. त्यांनी दाखवलेले साहस अपवादात्मक व वैशिष्ट्यपूर्ण आहे. दोन मुलींचा आई म्हणून, त्यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणे माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे सुश्मिता सेन म्हणाली .