लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणूक : भाजपचे 38 नगरसेवक गोव्याला

लातूर : येत्या 21 मे रोजी होत असलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपचे जवळपास 38 नगरसेवक अज्ञातस्थळी सहलीला गेले आहेत. तथापि, ही सहल नसून पुणे येते प्रशिक्षण शिबिरासाठी जात असल्याची बतावणी स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे. भाजप उमेदवार सुरेश धस हे येथून निवडणुक लढवत आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती हे विधान परिषदेचे मतदार असतात.

विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजार तेजीत असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक बळी पडू नये यासाठी जवळपास ३८ नगरसेवक सक्तीच्या सहलीवर गोवा येथे गेल्याचे बोलले जात आहे. लातूरमध्ये काँग्रेसची ताकद असल्यामुळे कुठलीही ‘रिस्क’ भाजप घेणार नसल्यामुळे नगरसेवकांची ही ‘टूर-टूर’ गोव्याला गेल्याचेही बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने अशोक जगदाळे यांना पुरस्कृत केले आहे.