कुमार आणि प्रभाकर पाहतात, शेतीत लाखांचे स्वप्न !

कोल्हापूर : शेतीत दम नाही; तोटाच आहे. ही सार्वत्रिक तक्रार असते. ती चूक आहे असेही नाही. बहुतेक स्थिती तशीच आहे. पण, वेगळ करून दाखवणारेही असतातच. कुमार आणि प्रभाकर या दोन मित्रांनी ३ एकरच्या शेतात ३५ – ४० लाखांचे उत्पन्न मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील देवाळे गावचे कुमार पाटील आणि बेले गावचे प्रभाकर पाटील पंधरा वर्षांपूर्वी बुलडोझरवर काम करत होते तिथे त्या दोघांची मैत्री झाली. त्यांनी शेती करण्याचे ठरवले. कळंबा गावात रंगराव पाटील यांची सव्वा तीन एकर शेती ७५ हजार रुपये वार्षिक भाडे तत्वावर घेतली. जमीन माळरानाची असल्यानं चांगली मशागत केली. भरपूर सेंद्रिय खतं घालून जमीन तयार केली. या तीन एकरमध्ये तीन प्लॉट असून २० गुंठे, एक एकर आणि तिसरा दीड एकराचा आहे.

सांगली जिल्ह्यातून इंद्रा आणि १८६५ अशा दोन जातीची ढोबळी मिरचीची तयार रोपे आणली. इंद्रा जातीची दहा हजार आणि १८६५ जातीची पंचवीस हजार अशी एकूण ३५ हजार रोपांची ९ ते ११ जानेवारी दरम्यान लागवड केली.

एकसष्ठाव्या दिवशी मिरचीची काढणी सुरु झाली. पहिल्या तोड्यात ७ टन उत्पादन मिळालं. साधारण आठएक दिवसाच्या अंतराने काढणी करण्यात येते. आतापर्यंतच्या चार तोड्यात ४५ टन उत्पादन मिळालं आहे.

दिल्ली, मुंबई, हैद्राबाद येथे मिरची पाठविण्यात येते. किलोला सरासरी १५ रुपये दर मिळाला आहे. आता पर्यंत साडे सहा लाख रुपये मिळाले आहेत. खर्च पाच लाख झाला आहे. तीन एकरातून 250 टन ढोबळी मिरचीचं उत्पादन अपेक्षित आहे.