मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर होते गिरीश कर्नाड

बंगळुरू : गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या संशयितांच्या हिटलिस्टवरज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड हे होते, अशी माहिती पोलीस तपासातून समोर पुढे आली आहे. गिरीश कर्नाड यांच्याबरोबरच साहित्यिक बी. टी. ललिता नाईक, निदुमामिदी मठाचे स्वामी वीरभद्र चन्नमल्ला, पुरोगामी विचारवंत सी. एस. द्वारकानाथ यांच्यावरसुद्धा त्या आरोपींचा निशाणा होता अशी माहिती तपासात निष्पन्न झाले आहे

लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांच्या बंगळुरुतील घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, के टी नवीन, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीफ, मनोहर इडावे आणि परशुराम वाघमारे या सहा जणांना अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून हस्तलिखितांच्या नोंदी असलेल्या तीन डायऱ्या मिळाल्या आहेत. यात सांकेतिक भाषांचा वापर असून गिरीश कर्नाड, बी टी ललिता नाईक यांच्यासह चार जणांची नावे या डायरीत असल्याचे समोर आले आहे. चौघांनीही कट्टर हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती.

द्वारकानाथ यांनी प्रभू राम अस्तित्वात नाही, असे विधान केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती. ‘डायरीत नावं असलेली सर्व मंडळी ही गौरी लंकेश यांचे समर्थक होते किंवा लंकेश यांच्या विचारांशी सहमत होते. त्या सर्वांनी वेळोवेळी हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती’, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. सांकेतिक भाषेची उकल केली जात असून यानंतर नेमकी माहिती समजू शकेल’, असे एसआयटीमधील सूत्रांनी सांगितले.