कार्तिकी एकादशी; एसटी कंडक्टरला विठूरायाच्या पूजेचा मान

kartiki

पंढरपूर: वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेला महत्त्व आहे. आषाढ ते कार्तिक या चातुर्मासाची समाप्ती कार्तिकी यात्रेत होते. या यात्रेसाठी सुमारे ४ लाख भाविक पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. मंगळवारी पहाटे विठ्ठल- रुक्मिणीची सरकारी महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांची पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. या महापूजेत मानाचे वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बळीराम चव्हाण आणि त्यांची पत्नी शिनाबाई यांना मिळाला. चव्हाण दाम्पत्य हे कर्नाटकच्या विजापूर तालुक्यातील हडगल्लीचे निवासी आहेत. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू दे असं साकडंही त्यांनी विठूरायाला घातले.

टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून निघाली असून भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यातून १४०० जादा बसेस तर आठ विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.

महापूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने चव्हाण दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत देण्‍यात येणारा मोफत एस.टी. पासही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चव्हाण दाम्पत्याला देण्यात आला.

सत्कार समारंभात चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि मजूर यांच्या हिताला सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आणि शेतीची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत, असे पाटील यांनी सांगितले. राज्यातील जनतेला सुख व सुरक्षा मिळू दे, असं साकडंही माऊलीला घातल्याचे त्यांनी सांगितले. समारंभास मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, श्रीकांत भारतीय उपस्थित होते.