काँग्रेसकडून जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर

नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत असले तरी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत . त्यासाठी काँग्रेसने जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असून याबाबत जेडीएस नेते, माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस त्यामुळे कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे .

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सोनिया गांधी आणि आझाद यांच्यात चर्चा झाली असून सोनिया यांनी त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भात देवगौडा यांच्याशी चर्चा करण्यास आझाद यांना सांगितले असून आझाद हे देवगौडा यांच्याशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे जेडीएस आणि काँग्रेस दरम्यान आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपनं प्रादेशिक पक्षांना आपल्या बाजूला वळवून दोन्ही राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्याचंच उट्टं काढण्यासाठी आता काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकमध्ये बहुमतासाठी ११३ जागा हव्या आहेत. मात्र कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही.

कर्नाटकमध्ये भाजप १०६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७३ आणि जेडीएस ४१ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि जेडीएस यांची आघाडी झाल्यास दोन्ही पक्षांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.