कर्नाटक विधानसभा निवडणूक; बेळगावात मएस पिछाडीवर  

मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगावातील जागांचे निकाल पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. बेळगावातील एकूण १८ जागांपैकी सध्या भाजपाने ८ जागांवर तर काँग्रेसने ३ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर महाराष्ट्राला अपेक्षा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीची पार्टी केवळ १ जागेवर आघाडीवर आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश मिळण्याची सर्वात मोठी शक्यता आहे. त्यापैकी दक्षिण बेळगावमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. तर उर्वरित तीन जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र, याठिकाणची मतमोजणी उशीरा सुरू झाल्याने प्राथमिक कल हाती येण्यास वेळ लागत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा ११० जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस ६९ तर किंगमेकर ठरू शकणारा जेडीएस पक्ष ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर २ अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, जनतेचा कौल भाजपाकडे असल्याचं चित्र सध्यातरी बघायला मिळत आहे. मतमोजणीची सुरुवात दोन तासांपूर्वी झाली असून, भाजपा आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होणार असं चित्र समोर येत आहे. एकंदरीत या निवडणुकीत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष किंगमेकरच्या भूमिका निभावू शकतो.