कन्हय्या कुमार, हार्दीक पटेल यांना संभाजी ब्रिगेड देणार ‘देशभक्त पुरस्कार’

सोलापूर : ” देशातील व राज्यातील सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे त्या कन्हय्या कुमार व हार्दीक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्यावतीने देशभक्त पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” भीमा कोरेगाव दंगलही भाजप सरकार पुरस्कृत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः:कडे गृह, विधी व न्याय मंत्रालयाची खाती ठेवून आरोपींना क्‍लिनचिट देण्याचे काम करत आहेत,” असा आरोप करून गायकवाड पुढे म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिमेमुळे देशात परकीय गुंतवणूक होण्यास अडथळा निर्माण होत आहे. परदेशात जाऊन त्या ठिकाणी भारतीयांच्या सभा घेऊन तेथील सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांचा फसला आहे.” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेतून भारतीयांना सर्व हक्कांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र घटनेची पूर्ण अंमलबजावणी होत नाही. घटनेची अंमलबजावणी व्हावी, महाराष्ट्रातील जातीय सलोख्याचे वातावरण टिकून राहावे यासाठी संभाजी ब्रिगेड येत्या काळात कार्य करणार आहे. त्यासाठी संघटनात्मक व ऐतिहासिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी केडर कॅम्प घेण्यात येणार आहे ,” अशी माहितीही गायकवाड यांनी यावेळी दिली.