कठुआ, उन्नाव घटनांच्या निषेधात उस्मानाबाद येथे कॅन्डल मार्च

उस्मानाबाद : कठुआ आणि उन्नावच्या घटनेच्या निषेधात रविवारी उस्मानाबाद शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये मोठया संख्येत नागरिक सहभागी झाले होते. मुलींच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली. हा कॅन्डल मार्च उस्मानाबादच्या आजाद चौकातून काढण्यात आला असून,शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.

जम्मू काश्मीर येथील कठुआ येथे आठ वर्षीय असिफाला एका मंदिरात बंदिस्त ठेऊन तिच्यावर ६ दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. त्यानंतर तिला दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तर उत्तर प्रदेश येथील उन्नाव येथील घरकाम करणाऱ्या मजुराच्या १६ वर्षीय मुलीवर वारंवार भाजपच्या आमदाराने अत्याचार केला.त्यांनतर मुलीचे वडील पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेले असता, त्यांना धमकावत मारहाण करण्यात आली होती. याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता.