मिठागाराची जागा गिळू देणार नाही – रामदास कदम

मुंबई : राज्य सरकारच्या मिठागाराच्या जागेवर कमी किमतीत घरे बांधण्याच्या प्रस्तावाला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विरोध कडाडून विरोध केला आहे. मुंबईचे पर्यावरण धोक्यात आणणारे आणि केवळ बिल्डरांच्या नफ्यासाठी आखलेले हे धोरण म्हणजे केवळ धूळफेक असून, गरिबांची ढाल करून त्यांना बनवण्याचा प्रकार आहे. हे सरकार समुद्रच गिळायला निघाले आहे अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

या योजनेमुळे मुंबईच्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि मुंबईला अधिक त्रास होईल. त्यामुळे या खार जमिनी सरकारी धोरणाच्या नावाखाली गिळू देणार नाही, असा इशाराही त्यांनी बैठकीत दिला आहे. या पूर्वीही महाराष्ट्रात कमाल जमीन नागरी कायदा रद्द करून शासनाने अशीच धूळफेक केली होती. तेव्हा एकट्या शिवसेनेने त्यास जोरदार विरोध केला होता. अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. शासनात बसलेले काही उच्चपदस्थ अधिकारी अश्याप्रकारे धोरणे आखून बिल्डरांना लाभ पोहचवितात. आणि राज्याच्या जनतेला भूलथापा देऊन बनवतात. मुंबईच्या पर्यावरणाला ऱ्हास होईल असा कुठलाही प्रकार शिवसेना साध्य होऊ देणार नाही. असा कडक इशारा कदम यांनी दिला आहे.