काश्मीरमध्ये पत्रकाराची गोळ्या घालून हत्या, सुरक्षा पोलिसही ठार

श्रीनगर : येथील ‘रायझींग काश्मीर’चे संपादक सुजात बुखारी यांची श्रीनगरमधल्या लाल चौकात असलेल्या प्रेस कॉलनीमध्ये अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. येथेच रायझींग काश्मीर या वृत्तपत्राचं ऑफिस होते.

बुखारी हे आपल्या ऑफिसमधून बाहेर पडत असतानाच गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात बुखारी यांचा जागीच मृत्यू झाला. बुखारी यांच्या सरंक्षणासाठी असलेला पोलिसही गोळीबारात ठार झाला आहे.

लाल चौक हा श्रीनगर शहरातला सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या भागात हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. बुखारी हे इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडत होते.

या आधीही बुखारी यांच्यावर 2000 मध्ये हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांना संरक्षण देण्यात आले होते. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. रमजान महिना असल्याने सुरक्षा दलाने एकतर्फे शस्त्रसंधी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. ईद झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरूद्ध धडक कारवाई करण्यात येईल असा इशार सुरक्षा दलाने दिला आहे.