सुरक्षेच्या कारणास्तव जेट एअरवेजच्या मुंबई- दिल्ली विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिग

अहमदाबाद : जेट एअरवेजच्या मुंबई – दिल्ली विमानाचे सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात उर्दू भाषेतील एक पत्र सापडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे लँडिंग करण्यात आली असल्याची माहिती असून बॉम्बशोधक पथक आणि सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी करत आहे.

विमानात उर्दू भाषेतील एक पत्र सापडल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती, असे समजते. मात्र या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. जेट एअरवेजने या वृत्तावर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करत असून प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे जेट एअरवेजने म्हटले आहे.

जेट एअरवेजचे ९डब्ल्यू ३३९ हे विमान मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी निघाले. पहाटे तीनच्या सुमारास विमानाने मुंबईतून उड्डाण केले. मात्र पावणे चारच्या सुमारास विमानाचे अहमदाबादमध्ये लँडिंग करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले असून सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी करत आहे. विमानात ११५ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर्स होते.