खोदकामात मूर्ती सापडली, मूर्तीशेजारी आला नाग!

बीड : परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी गावाजवळ जलालपूर शिवारात खाणीसाठी जेसीबी मशिनने खोदकाम करत असतांना देवाची मूर्ती सापडली; त्या मूर्तीजवळ एक नाग आला आणि मूर्तीच्या डोक्यावर फणा काढून बसला! मूर्ती पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी झाली तरी नाग तिथून हटत नव्हता त्यामुळे मूर्तीबद्दल लोकांमध्ये श्रद्धेची भावना वाढत गेली.

लोकांनी हळद-कुंकू वाहून मूर्तीची पूजा करणे सुरु केले. यामुळे मूर्तीचे नुकसान होऊ नये म्हणून तहसीलदार झाडके यांनी आवाहन केले आहे की, मूर्तीचे फक्त दर्शन करा, पूजा करू नका. मूर्तीच्या संरक्षणासाठी दोन पोलीस तैनात केले आहेत.

ही मूर्ती कुबेराची आहे असे लोकांचे म्हणने आहे. पण, तहसीलदार झाडके म्हणाले की मूर्ती कोणत्या देवाची आहे हे आताच निश्चित सांगता येत नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असून भारतीय पुरातत्व खाते याबाबत निर्णय देईल.