केबल टीव्हीसोबत इंटरनेटही मिळण्याची शक्यता !

- बीएसएनएलची योजना

नवी दिल्ली : केबल टीव्हीच्या बिलामध्ये लवकरच इंटरनेटही मिळू शकेल. बीएसएनएल केबल आॅपरेटर्सशी याबाबत चर्चा आणि करार करीत आहे. जिओ एफटीटीएच योजनेला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल हा प्रयत्न करत आहे.

बीएसएनएलचे मुख्य कार्यकारी संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी याबाबीत माहिती देतांना सांगितले की, आम्ही टीव्हीधारकांना केबल टीव्हीवर इंटरनेट देण्याचा विचार करीत आहोत. दक्षिण आणि पश्चिम भारतात याबाबत केबल आॅपरेटर्सशी लवकरच करार करण्यात येणार आहेत.

यामुळे इंटरनेटसाठी वेगळी केबल टाकण्याची गरज पडणार नाही. बीएसएनएलचा खर्चही वाचेल व ग्राहकांना केबल टाकण्याचे वेगळे पैसेही द्यावे लागणार नाहीत. ग्राहक टीव्ही स्क्रीनवर इंटरनेट चालवू शकतील. त्यासाठी त्यांना वेगळा की बोर्ड, माउसची गरज पडणार नाही. इंटरनेटमध्ये समस्या निर्माण झाल्यास त्यांना बीएसएनएलच्या कार्यालयात फोन करण्याची गरज भासणार नाही. केबल आॅपरेटर्स ते दूर करु शकतील. पहिल्या टप्प्यात आम्ही प्रायोगिक तत्वावर विशेष आॅफर देण्याचा विचार आहोत. यासाठी इंटरनेटचे वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. सध्याच्या केबल बिलात त्यांना इंटरनेटची सुविधा मिळेल. याची गतीही चांगली असेल.

अनुपम श्रीवास्तव पुढे म्हणाले की, १0 कोटींहून अधिक घरांत केबल कनेक्शन आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचू. याशिवाय वेगळी केबल टाकून इंटरनेट कनेक्शन देण्याची योजनाही सुरूच राहील. यामुळे आमचे उत्पन्न आणि नफाही वाढेल.