मोदींचा अपमान करणाऱ्यांना जगातूनच गायब करू; भाजपा खासदाराचे विवादित वक्तव्य

भोपाळ : या वर्षीच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक संपन्न होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. आता भाजपचे मध्य प्रदेशामधील खासदार मनोहर ऊंटवाल यांनी विरोधकांवर टीका करताना विवादित वक्त्यव्य केले आहे. ‘आमच्या पंतप्रधानांचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही या जगातून गायब करु,’ असं ऊंटवाल यांनी म्हटलं आहे. किसान सन्मान यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केलं. याआधीही ऊंटवाल यांनी अनेकदा विवादित वक्तव्य केले आहे.

गेल्याच आठवड्यात खासदार ऊंटवाल यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. दिग्विजय सिंह दिल्लीवरुन आयटम घेऊन आले आहेत, असं वादग्रस्त विधान ऊंटवाल यांनी केलं होतं. दिग्विजय सिंह यांची पत्नी अमृता सिंह यांच्याबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली होती. मात्र त्यांनी अमृता सिंह यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. या विधानावरुन ऊंटवाल यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. यानंतर ऊंटवाल यांनी याबद्दल सारवासारव केली. ‘मी दिग्विजय सिंह यांचा खूप आदर करतो आणि महिलांचाही सन्मान करतो,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. माझ्या वक्तव्याची मोडतोड करुन ते प्रसारित करण्यात आलं, असाही दावा त्यांनी केला होता.