भुजबळ कुटुंबाला घाबरवण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील भुजबळ कुटुंबाला घाबरवण्यासाठी कुणीतरी त्यांच्या घरी विचित्र वस्तू टाकतो आणि इन्स्टाग्राम फोटो पाठवतो आहे.

भुजबळ कुटुंबातील जयकुमारच्या वाढदिवशी कुण्या अज्ञात इसमाने भुजबळ कुटुंबाच्या अंगणात एक डबा ठेवला. त्यात रक्ताने माखलेलं कोंबडीचे मुंडके, पत्त्यातील जोकरचं पान आणि मुलगा जयकुमार याचं उलट्या दिशेने लिहिलेले नाव अशा वस्तू होत्या.

नन्तर १० एप्रिलला सकाळी भुजबळ कुटुंबीयांच्या गाडीवर जोकर वगळता पत्त्याच्या सेटमधील इतर पत्ते फेकण्यात आले.
डब्याचे फोटो अज्ञाताने ‘व्हाय सो सीरियस’ या इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरुनही शेअर केले आहेत. जयकुमारच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो टाकून त्यावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला आहे.

हा प्रकार जयकुमारच्या क्लासपर्यंत पोहोचला आहे. जयकुमारने क्लासजवळ पार्क केलेल्या गाडीवर कुणीतरी काळा रंग फेकला आणि पुन्हा इन्स्टाग्रामवर फोटो टाकून होळीच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या दीड महिन्यापासून असे काही-ना-काही प्रकार भुजबळ कुटुंबीयांसंदर्भात घडतच आहेत. काळ्या रंगापासून झालेली सुरुवात लाल रंगावर संपेल, अशी धमकीही भुजबळांना दिली आहे.

दिवसेंदिवस हे प्रकार वाढू लागल्याने भुजबळ कुटुंबीय दहशतीत आहेत. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे.