मूळा धरणात विष कालविल्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन

राहुरी : मासेमारीसाठी मुळा धरणात विष कालविले जात समोर आल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. मुळा धरणातील विषप्रयोग निदर्शनास आल्यानंतर राज्यातील इतरही धरणांमधील पाणी साठ्यांमध्ये असा विषप्रयोग होऊ नये, यासाठी राज्य पातळीवरील धोरणच ठरविण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी झालेल्या बैठकीत मुळा धरण प्रकरणाची दखल घेण्यात आली. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत प्रधान सचिव अनिल डिकीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले, धरणातील पाणी साठा शुध्द राहिले पाहिजे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल़ धरणातील पाणी दूषित करणे हा गंभीर गुन्हा आहे़ स्पेशल टास्क फोर्सव्दारे कारवाई केली जाईल.