‘रामायण एक्सप्रेस’ नेणार रामायणकाळात

नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये रामायणाचे संदर्भ असलेली ठिकाणे आहेत. परंतु, काही ठिकाणांवर नागरिकांना भेट देणे शक्य नव्हते. मात्र देशातील सर्व रामायणकालीन स्थळांचे दर्शन नागरिकांना करता यावे, यासाठी भारतीय रेल्वेने ‘श्रीरामायन एक्सप्रेस’ या नवीव पर्यटन एक्सप्रेसची घोषणा केली आहे. देशातील सर्व रामायणकालीन स्थळांचे दर्शन या एक्सप्रेसमुळे नागरिकांना आता घडणार आहे, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रामायणकाळातील महत्वाच्या स्थळांना जोडणारी ही यात्रा असून १६ दिवसीय असणार आहे. दिल्लीहून ही सेवा १४ नोव्हेंबरला सुरु होणार असून या एक्सप्रेसचा मुख्य मार्ग अयोध्या ते श्रीलंका असा राहणार आहे. दिल्लीतून सुरुवात झाल्यानंतर नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, चित्रकूट, हम्पी, नाशिक आणि रामेश्वरम या ठिकाणी ही गाडी थांबणार आहे. या एक्सप्रेसचे प्रति व्यक्ती तिकीट १५ हजार ६०० रुपये राहील. यात प्रवाशाच्या खाण्या-पिण्याची तसेच निवासाची सोय राहील. पर्यटन स्थळी फिरण्याकरिता इतर सेवादेखील रेल्वे उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.