एप्रिल आणि मे महिन्यात राहणार देशातील १५३ जिल्ह्यात तीव्र दुष्काळ !

नवी दिल्ली : उन्हाळ्यात प्रत्येक वर्षी देशातील अनेक भागात पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. मात्र, यावेळी ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत. कारण यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशभरात जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ६३ टक्के पावसाची तूट राहणार आहे.

तर मार्च ते एप्रिल या काळात हेच प्रमाण ३१ टक्के राहणार आहे. एप्रिल आणि मे या दोन तीव्र उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये देशातील बहुतांश भागात पाण्याच्या दुर्भिक्षाची स्थिती राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, वाढत्या तापमानाच्या काळात भारतातील ४०४ जिल्ह्यांमध्ये साधारण ते तीव्र स्वरुपात दुष्काळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. या ४०४ जिल्ह्यांपैकी १४० जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत तीव्र ते अत्यंत तीव्र दुष्काळी स्थितीची नोंद झाली आहे. यांपैकी १०९ जिल्ह्यांत सर्वसाधारण कोरडे हवामान होते तर १५६ जिल्ह्यांमध्ये साधारण कोरड्या हवामानाची स्थिती होती.

जानेवारी ते मार्च या महिन्यांदरम्यान, देशातील १५३ जिल्ह्यांत पावसाचा शिडकावा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने ५८८ जिल्ह्यांपैकींच्या या आकडेवारीची माहिती दिली आहे. यासाठी गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून झालेल्या पावसाचा अभ्यास करण्यात आला आहे.