कर्नाटकात बाजी मारल्यास २१ राज्यांवर एनडीएचे वर्चस्व 

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात होत असलेली विधानसभा निवडणूक 2019 च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे . आज जर कर्नाटकात भाजपने बाजी मारली तर एकूण २१  राज्यांमध्ये भाजपशासित  एनडीएचं सरकार असेल.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात सहा दिवसात 21 सभा घेतल्या, तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या 27 सभा आणि रॅली झाल्या.  तर पाच वेळा नमो अॅपवरुन कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या अॅपच्या माध्यमातून 25 लाख लोकांसोबत संवाद साधला, असा भाजपचा दावा आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी मोदींनी सहा दिवस दिले असले, तरी अमित शाह गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाकटवर लक्ष ठेवून आहेत.

पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी दक्षिण भारतातील ही निवडणूक मोठी परीक्षा आहे. कर्नाटकात भाजप 2008 ते 2013 या काळात सत्तेत होती. दक्षिण भारतात पहिल्यांदाच कमळ फुलवणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनीही मैदानात उतरत जोरदार प्रचार केला.