मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देशाचं आणखी वाटोळं : केतकर

मुंबई : 2019 च्या निवडणुकींनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचं खूपच वाटोळं होईल, या शब्दात ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी मोदींवर टीका केली. ते एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचं वाटोळं होईल

असं मत मी २०१३ सालीच मांडलं होतं. की, मोदी पंतप्रधान झाले तर देशाचं वाटोळं होईल. आताही मला वाटतं की २०१९ साली मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचं आणखी वाटोळं होईल. आताही देशाचं खूपच वाटोळं म्हणजे खूपच वाटोळं झालं आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की, बीफ, लव्ह जिहाद यासारख्या विषयांवर कधी एवढी चर्चा होईल. पण मोदी सरकार आल्यानंतर या विषयांवर चर्चा सुरु झाली. त्यामुळे देशातील वातावरण बिघडलं.

२०१४ साली मोदी निवडून आले तेव्हा त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. पण गेल्या वर्षभरापासून त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड घट होत आहे. याला मीडिया काही प्रमाणात जबाबदार आहे. कारण मीडियामुळे समाजात या प्रतिमा निर्माण होतात.

‘अटलबिहारीचं सरकार असताना 2004 सालच्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण त्याचवेळी लोकांनी वाजपेयींना नाकारलं आणि काँग्रेसच्या हातात सत्ता सोपावली. सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं अशी मागणीही तेव्हा सर्वांनी केली. पण त्यावेळी सोनियांनी पंतप्रधान पद नाकारलं. राजकारणात असे बदल होतच असतात.’ असं केतकर म्हणाले.

बाळासाहेबांनी खासदारकीची ऑफर दिली होती

राज्यसभेची खासदारकी स्वीकारताना माझ्या मनाची कधीही ओढाताण झाली नाही. याच्या आधीही मला काँग्रेसची दोनदा खासदारकीची ऑफर आली होती. एकदा २००८ साली आणि दुसऱ्यांदा २०१२ ला. तेव्हा मी लोकसत्तेचा मुख्य संपादक होतो. त्याच्याही आधी मला एकदा ऑफर आली होती. तेव्हाही मी नाहीच म्हटलं होतं. ती शिवसेनेची ऑफर होती आणि थेट बाळासाहेबांनीच दिली होती. त्यावेळेस माझ्या डोक्यात तसा काही विचारही नव्हता. मी बाळासाहेबांना ताबडतोब नकार दिला होता, असा गौप्यस्फोटही केतकरांनी केला.

अनपेक्षित

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की, यापुढे तरुणांना प्राधान्य देणार. त्यामुळे तेव्हा मला वाटलं नव्हतं की मला खासदारकीची ऑफर येईल. पण अचानक खासदारकीची ऑफर आली. मी त्यांना तात्काळ माझा होकार कळवला नाही. दोन तास विचार करुन मी त्यांना माझा निर्णय सांगितला, असं केतकर म्हणाले.

माझ्यावर टीका नवी नाही

जेव्हा देशात मोबाईल नव्हते, ट्रोलिंगचा प्रकार नव्हता त्यावेळेसपासून माझ्यावर टीका सुरु आहे. मी अग्रलेखात सर्रास काँग्रेसचं समर्थन केलं आहे. ते मान्यही करतो. पण त्याचबरोबर मी ज्या वृत्तपत्रांमध्ये काम केलं तिथे माझ्यावर टीका करणारे लेखही छापले. यालाच निपक्षपातीपणा म्हणतात. माझी भूमिका स्पष्टपणे मांडत असलो तरी, व्यक्तीश: माझ्यावर टीका करणारे लेख अग्रलेखाच्या पानावर छापले आहेत. बहुदा माझ्या स्पष्ट भूमिकेबाबतच वृत्तपत्रांच्या मॅनेजमेंटचा माझ्यावर विश्वास होता. त्यामुळे मला कायम वेगवेगळ्या ऑफर मिळाल्या, असं केतकर म्हणाले.