पगडीवरून इतके रामायण होईल, असे वाटले नव्हते : शिरिष मुरुडकर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी झालेल्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर पगडीवरून इतके रामायण होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी दिली. इतकेच नव्हे तर पगड्या बघायला आणि खरेदीला येणा-यांमध्ये वाढ झाल्याचे ते म्हणाले.

शरद पवार यांनी आवर्जून छगन भुजबळ यांचा रविवारी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला. त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ही पगडी कुठून घेण्यात आली याबद्दल माहिती असता बुधवार पेठेतील मुरुडकर झेंडेवाले या दुकानाचा शोध लागला. या दुकानात अनेक वर्षांपासून पगड्या तयार केल्या जात असून बाजीराव मस्तानीसारख्या चित्रपटातही इथल्या पगड्या वापरल्या गेल्या आहेत. इथे पुणेरी आणि फुले पगडी व्यतिरिक्त शिंदेशाही पगडी, बत्ती पगडी, तुकाराम पगडी, मराठमोळा फेटा, पेशवाई पगडी, मावळे पगडी अशा विविध पगड्या मिळतात. याच दुकानातून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीची पुणेरी पगडी आणि नंतरची फुले पगडी आणण्यात आली होती.

कायमच आमच्याकडे सत्कार समारंभांसाठी पगड्या खरेदी करण्यासाठी गर्दी असल्याचे मुरुडकर यांना विचारले असता सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी पुणेरी पगड्या खरेदी करण्यात आल्या हेच मुळात माहिती नसल्याचे सांगितले. नंतर घाईघाईत फुले पगडी घेण्यासाठी आलेले कार्यकर्तेही भर सभेतून धावतपळत आल्याचे माहिती नव्हते.मात्र दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर आमच्या दुकानाचे नाव आणि पगडीची चर्चा होत असल्याचे काहींनी सांगितले. पुढचे दोन दिवस तर पगडीवरून इतकी चर्चा, लेख, मुलाखती बघायला मिळाल्या की या घटनेवरून एवढी चर्चा होईल असे स्वप्नातही वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले.