हंगेरीच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट

मुंबई  : हंगेरी देशातील शैक्षणिक शिष्टमंडळाने आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची सेवासदन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी हंगेरी देशाचे डेप्युटी स्टेट सेक्रेटरी स्कीलवेस्टर बस, कौन्सलेट जनरल ऑफ हंगेरीचे डेप्युटी हेड डॉ. इमोला इझोबा टेकाक्स, हंगेरी येथिल महावाणिज्य दुतावास डॉ.नोबर्ट रेवाय बेरे उपस्थित होते.

यावेळी हंगेरी येथे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भांत चर्चा करण्यात आली. ही शिष्यवृत्ती विशिष्ट विषयांसाठी नसून सर्व शाखातील विद्यार्थ्यांसाठी असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी स्पष्ट केले. या शिष्यवृत्तीची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठासोबत चर्चा करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.