हिंदुस्थान हिंदूंबरोबरच इतर धर्मीयांचाही: सरसंघचालक मोहन भागवत

इंदूर:  ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे. ब्रिटीशांचा ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा अमेरिका आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. हिंदुस्थान हा फक्त हिंदूंधर्मिय लोकांचाच देश नाही तर इतर धर्मिय लोकांचाही देश असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. इंदरूमधील एका महिला महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशाला महान बनविण्यात समाजाचे मोठे योगदान असते कुठलाही एक नेता किंवा एक पक्ष देशाला महान बनवू शकत नाही, असे सांगताना भागवत म्हणाले, पूर्वी काहीही समस्या जाणवू लागल्यावर लोक देवाकडे साकडे घालायचे किंवा देवाला दोष द्यायचे. सध्या कलियुग आहे यावेळी लोक सरकारला दोष देतात. पण सरकारला जेव्हा समाजाची योग्य साथ मिळते तेव्हाच सरकारला लोकांच्या समस्या निवारण्याचे काम योग्यपणे करता येते, असेही भागवत म्हणाले.

भारतामध्ये जगातील महासत्ता होण्याची क्षमता आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल. जेव्हा समाज बदलतो तेव्हा सरकारवरही त्याचा परिणाम बघायला मिळतो. सरकारी यंत्रणांमध्येही बदल बघायला मिळतात, असेही मोहन भागवत म्हणाले.