पेट्रोल 4 रुपयांपर्यंत वाढू शकते

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसात या किंमती प्रतिलिटर चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

कर्नाटक निवडणूक संपल्यानंतर आतापर्यंत प्रति लीटर पेट्रोल 69 पैशांनी महागले असून यामध्ये आज झालेल्या 22 पैशांच्या वाढीचाही समावेश आहे. या आठवडयात डिझेलच्या किंमतीमध्ये 86 पैसे वाढ झाली असून आज 22 पैशांची वाढ झाली.

कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे.

ब्रोकरेज फर्म कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीजच्या म्हणण्यानुसार कर्नाटक निवडणुकीच्या आधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.