‘कलम 35 A’वर सुनावणी आज, संपूर्ण देशाचं लक्ष

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज (30 ऑक्टोबर) ‘कलम 35A’वरील याचिकांवर सुनावणी होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिकांना विशेषाधिकार देणाऱ्या ‘कलम 35A’विरोधात सर्वोच्च न्यायालयात 4 याचिका दाखल आहेत. मुख्य न्या. दीपक मिश्रा, न्या. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचं खंडपीठ यावर सुनावणी करणार आहे.

2014 मध्ये कलम-35A ला आव्हान देणारी मुख्य याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारकडे यासंदर्भात उत्तर मागितले. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने कलम-35A वर व्यापक चर्चेची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त केले. सुप्रीम कोर्टाने ही याचिका तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

‘कलम 35A’विरोधात एकूण चार याचिका आहेत. मात्र उर्वरित तीन याचिका या मुख्य याचिकेतच समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्यामुळे चारही याचिकांवरील सुनावणी एकत्रच होईल. मुख्य याचिका जी पहिल्यांदा दाखल केली गेली, ती दिल्लीतील एका समाजसेवी संस्थेची आहे.