शुटर नईमच्या चौकशीला आजपासून सुरुवात

ठाणे : दाऊद इब्राहिम गँगचा खास माणूस असलेल्या शूटर नईम खान याच्या चौकशीला आजपासून सुरुवात होणार असून यात दाऊद गॅंगचे अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. नईम खानच्या या चौकशीतून एके ५६ रायफलशी संबंधित असलेले रहस्य देखील समोर येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

नईम खान याच्या गोरेगावमधील बांगुर नगर येथे असलेल्या घरातून एके ५६ रायफलसह ३ मॅगझीन, ९५ जिवंत काडतुसे, २ नाईन एमएम पिस्तूल आणि १३ जिवंत काडतुसे ठाणे खंडणी विरोधी पथकाने जप्त केले होते. हा शस्त्रसाठा कुठून आणि कुठल्या उद्देशाने आणण्यात आला होता, या बाबतची तपास ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. या शस्त्रसाठ्याशी संबंधित असलेली गुपिते नईमला माहिती असल्याने, त्याचा ताबा मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर शुक्रवारी मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयातून नईम खानचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला असून आजपासून त्याची चौकशी सुरू करण्यात येईल, अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली आहे.

नईम हा सध्या एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. त्याची पत्नी यास्मिन नईम खानला देखील पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेली रायफल आणि इतर शस्त्रसाठा माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा असून मला त्याबाबत काहीही माहिती नाही, असे यास्मिनने पोलिसांना उत्तर दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला शस्त्रसाठा १९९३ बॉम्बस्फोटाशी संबंधित असण्याची शक्यता असून अनेक प्रश्नांची उत्तरे या चौकशीतून मिळतील, अशी ठाणे पोलीस अपेक्षा करत आहेत.