हा मराठी अभिनेता करेल प्रियंकाच्या ‘पाणी’ चे दिग्दर्शन

Paani

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या राज्यभर स्टार मंडळींकडून प्रयत्न केले जात आहेत. या कॅम्पेनची सुरुवात आमीरच्या पाणी फाउंडेशन अंतर्गत करण्यात आली असून, आता याच विषयावर प्रियंका चोप्रा चित्रपट बनविणार आहे. ती आपले बॅनर पर्पल पेबेल पिक्चर्स म्हणजेच पीपीपी अंतर्गत जलसंकटावर चित्रपटाची निर्मिती करणार असून चित्रपटाचे नाव ‘पाणी’ आहे. प्रियंका ने ट्वीट करत ‘पाणी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या मराठी चित्रपटाला आदिनाथ कोठारे दिग्दर्शित करणार असून दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट असेल. त्यामुळे या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

माहितीनुसार, हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. ही कथा खास करून महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नागदरवाडी गावामध्ये सेट करण्यात आली आहे. हे गाव मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांतर्गत येते. चित्रपटात तेथीलच एका सामान्य माणसाच्या पाण्याबाबत केलेला संघर्ष दाखवण्यात येईल. आदिनाथ कोठारेने यामध्ये एक छोटीशी प्रेमकथाही जोडली आहे. तो या चित्रपटात फिल्म अभिनय करतानाही दिसेल. त्याच्याशिवाय चित्रपटात ऋचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम, गिरीश जोशीदेखील असतील. ‘ब्योमकेश बक्शी’ फेम रजित कपूरही यात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.