पालकमंत्री पाणंद रस्ते योजना राज्यातील शेतशिवारासह वाड्या- पाड्यांसाठी ठरेल उपयुक्त – रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल

नंदुरबार : पालकमंत्री पाणंद रस्ते योजना शेत शिवारातील रस्त्याबरोबर राज्यातील वाड्या-पाड्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते आसाणे, ता. जि. नंदुरबार येथे आज दुपारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते, यावेळी खासदार डॉ. हीना गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आसाणेचे सरपंच चंद्रकांत पाटील, जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथील प्रकल्पधिकारी वनामती सी., अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. रावल म्हणाले, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्याकरिता व यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता आहे. शेत रस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधींच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होतात. पाणंद रस्त्यांची कामे करण्याकरिता राज्य शासनाने पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी उत्पादित करीत असलेल्या माल वेळेत बाजारपेठेत पोहोचण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता आहे. यापूर्वीच्या गाड रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पाणंद रस्त्यांची आवश्यकता होती. याविषयावर विधानसभेतही चर्चा झाली होती. त्यानुसार ही योजना आकारास आली. चार प्रकारात ही योजना आहे. या योजनेची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला समृध्द करण्याचे काम सुरू आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या माध्यमातून राज्यात सव्वा लाख विहिरींची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 85 हजार विहिरींचे काम पूर्णत्वास आले आहे. तापी- बुराई योजनेसाठी आपला पाठपुरावा सुरू आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.

खासदार डॉ. गावित म्हणाल्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी योजना आणल्या आहेत. तापी- बुराई योजना तत्काळ मार्गी लावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार श्री. रघुवंशी म्हणाले, शेतकऱ्यांनी आपसातील मतभेद संपुष्टात आणून या रस्त्यांसाठी लोकसहभाग नोंदवावा. पालकमंत्री पाणंद रस्ते योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल.

जलसंधारण विभागाचे सचिव श्री. डवले म्हणाले, शेतात जाण्यासाठी रस्ते आवश्यक आहेत. बदलत्या काळानुसार शेतीसाठी यांत्रिकीकरण आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याएवढेच शेतकऱ्यांना रस्त्यांची गरज आहे. यापूर्वी शेत रस्त्यांसाठी योजना नव्हती. मात्र, रोहयो मंत्री श्री. रावल यांनी पुढाकार घेऊन आणि वेगवेगळ्या योजनांच्या समन्वयातून ही योजना कार्यन्वित केली. तसेच आर्थिक पाठबळ दिले आहे. शेत शिवारातील रस्त्यांची गरज लक्षात घेता लोकसहभाग वाढवावा, असेही नमूद केले.

जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले, लातूर येथे जिल्हाधिकारी असताना सचिव श्री. डवले यांनी पाणंद रस्त्यांचा उपक्रम व्यापक स्तरावर राबविला होता. नंदुरबार जिल्ह्यात या योजनेसंदर्भात सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सर्व संबधित यंत्रणा प्रमुखांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्यातून पाणंद कच्चा रस्ता मजबुतीकरणासाठी नंदुरबार तालुक्यातून 52,शहादा तालुक्यातून 56 तर तळोदा तालुक्यातून 4 रस्त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तसेच या योजनेंतर्गत 10 रस्त्यांचे काम सुरु आहे. या योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान आणि पालकमंत्री पाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. तसेच या योजनांच्या अंमलबजावणीत जिल्हा आघाडीवर राहील, असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. माधव कदम यांनी सूत्रसंचालन केले. अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments