कर्नाटकचे राज्यपाल काँग्रेसचे मुख्यमंत्री बनू देणार नाही – संजय राऊत

मुंबई : कर्नाटकमधे निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीमुळे आता सत्ता स्थापनेची आशा आता राज्यपाल वजुबाई वाला यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. राज्यपाल वजुबाई वाला सत्तेसाठी कोणाला आमंत्रित करणार, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्यपाल पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही याबाबत संशय व्यक्त केला आहे. कर्नाटकात राज्यपालाची भूमिका महत्वाची आहे, राज्यपाल संघाचे आहेत, राज्यपाल काॅग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

”कर्नाटकात राज्यपालाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यपाल आरएसएसचे आहेत. त्यामुळे राज्यपाल काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ देतील असं वाटत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटलंय. शिवाय, ”२०१९च्या निवडणुकांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही”, असा दावादेखील संजय राऊता यांनी केला आहे. तसेच कर्नाटकात गोवा,मणिपूरची पुनरावृत्ती यशस्वी झाली तर त्याचे कर्नाटकचे पडसाद देशभरात बघायला मिळतील, असा इशाराही संजय राऊतांनी भाजपाला दिला आहे.