समाजातील सर्व घटकांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण- सुभाष देसाई

Subhash Desai1

मुंबई : समाजातील सर्व घटकांचा सर्वसमावेश विकास करण्यावर सरकारचा भर असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने राज्य शासनाच्या उद्योग विभागाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती-जमाती प्रोत्साहन योजनेचा 140 हून अधिक उद्योजकांना फायदा झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

श्री. देसाई म्हणाले, राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेल्या अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील घटकांना औद्योगिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामाजिक प्रोत्साहन योजना’ जाहीर केली. राज्यातील 280 एमआयडीसीमध्ये अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांसाठी 20 टक्के भूखंड राखीव ठेवण्यात आला. याशिवाय उद्योग वाढीसाठी तयार गाळे उद्योजकांना देण्यात आले.

उद्योग उभारल्यानंतर वीज दरात सवलत देण्यात आली. कर्ज घेणाऱ्या उद्योजकांस व्याजदरात सवलत देण्यात आली. भांडवल उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली. यामुळे शासनाच्या या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला. दोन वर्षात 140 अनुसूचित जाती जमातीच्या उद्योगांनी आपले उद्योग सुरू केले, असेही ते म्हणाले.

‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामाजिक प्रोत्साहन योजना’

एकल मालकी घटक अनुसूचित जाती/जमाती उद्योजक 100 टक्के भागभांडवल, भागिदारी घटक यामध्ये अनुसूचित जाती/जमाती उद्योजक 100 टक्के भाग भांडवल, सहकारी क्षेत्र सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्थेमध्ये 100 टक्के अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उद्योजकांच्या किंवा दोन्हीचा समावेश असलेली संस्था, खासगी किंवा सार्वजनिक लि. घटक या घटकांमध्ये अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उद्योजकांचे भाग भांडवल किमान 100 टक्के असेल अशी कंपनी या पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांना सुविधा देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी उद्योग संचालनालय, मुंबई संकेतस्थळ www.di.maharashtra.gov.in अथवा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे संपर्क साधावा.