सरकार आरक्षणवादी-आरक्षण विरोधी गटात दंगे घडवण्याचा प्रयत्नात : प्रकाश आंबेडकर

मुंबई : हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दंगे घडवण्यात सरकारला फारसे यश येत नाही.त्यामुळे आता आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच, आरक्षणविरोधी शक्तींना सरकार खुले आम मदत करत आहे, असा हल्लाही त्यांनी यावेळी चढवला. यादरम्यान, त्यांनी भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्यात आली, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.

पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकीत आपली सत्ता येणार नाही, अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट असल्याची माहिती पसरवण्यात आली आहे.मोदी सध्या ७ झोन सिक्योरिटीमध्ये आहेत. त्यांची सिक्योरिटी १४ झोनची करा, असेही ते पुढे म्हणाले.

यादरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव भीमाची दंगल भडकवण्यात दोषी असलेले भिडे आणि एकबोटे यांना क्लीन चीट देण्यात येते आहे. उलट एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक होते. एल्गार परिषदेचा दंगलीशी काहीही संबंध नाही. ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा भीमा- कोरेगाव दंगलीशी कसा संबंध आहे? याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणीदेखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली आहे.