गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टल (GeM) पोर्टलचे मंत्रालयात प्रशिक्षण

गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टलमुळे भ्रष्टाचारमुक्त आणि परदर्शक कारभार शक्य- उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे

मुंबई: केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टलवर खरेदी व्यवहार सुरु करणारे महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य असून या पोर्टल मुळे भ्रष्टाचारमुक्त आणि परदर्शक कारभार शक्य होणार आहे, असे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे यांनी सांगितले. गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टल (GeM) वापरासंबधी आज मंत्रालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाचा वाणिज्य विभाग आणि राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

डॉ. कांबळे पुढे म्हणाले, 30 लाख रुपयांवरची खरेदी केंद्रातील विभागांना गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टलवरून करावी लागते मात्र राज्यात तीन लाखापेक्षा जास्त असलेली सर्व खरेदी आता या पोर्टलवरून करणे आवश्यक आहे. या पोर्टलवर अनेक सुधारणा करण्यात आल्या असून GeM (3.0) हे पोर्टल हातळण्यास अत्यंत सोपे आहे. ज्या लोकांना संगणक हाताळणीत अडचणी येतात त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. कोणतीही अडचण आल्यास उद्योग विकास संचालनालयाच्या didci@maharashtra.gov.in या मेल वर संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्याची खरेदीसाठी सुधारित नियमपुस्तिका उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टलवर खरेदीसाठी उपलब्ध वस्तू व सेवांचे दोन किंवा जास्त पुरवठादार असतील तर त्या वस्तू व सेवांची खरेदी गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टलवरुनच करावी हे बंधनकारक करण्यात आले आहे. या बाबतचा सामजस्य करारही नुकताच करण्यात आला आहे. या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टलबाबत संपुर्ण महाराष्ट्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आज मंत्रालयात झालेल्या प्रशिक्षणाला राज्यस्तरिय प्रशासकिय विभाग व इतर अधिनस्त कार्यालयातील सुमारे 300 अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता.

गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेसचे प्रशिक्षण संचालक रमेश महादेवन यांनी गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस पोर्टलच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले व उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.