लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण दयावे; महिला काँग्रेस कमिटीची मागणी

सोलापूर : भारत हा पुरुषप्रधान देश असल्यामुळे पुरूषाप्रमाणे महिलांनाही समान हक्क मिळावा. यासाठी सोलापूर शहर व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा-पाटील, निरीक्षक डॉ़ स्मिता शहापूरकर, प्रदेश सरचिटणीस सुनेत्राताई पवार, प्रदेश चिटणीस सुमन जाधव आदी उपस्थित होते़

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहनसिंग यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता भाजप सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिला किमान ३३ टक्के आरक्षण द्यावे, असे निवेदन यावेळी केले जात आहे.

यासाठी सह्यांची मोहिम राबवण्यात आली आणि अनेकदा निवेदन सुद्धा देण्यात आले. मात्र, याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलं नाही. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरीत हिवाळी अधिवेशनात महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासंबंधी ठराव करून आरक्षण देण्यात यावे याबाबतीचे निवेदन देण्यात आले.