14 गावातील 5,788 घरांच्या दारावर लेकीच्या नेमप्लेट

तळेगाव ढमढेरे: एकीकडे महिलांवर अत्याचार होत असताना शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे रांजणगाव साडस जिल्हा परिषद गटात मात्र एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून ‘लेकीचा सन्मान जपणारा’ गट म्हणून त्याची कीर्ती वाढत आहे. 14 गावातील एकूण 5 हजार 788 घरांच्या दरवाज्यावर लेकींच्या नेमप्लेट (नावाच्या पाट्या) झळकल्या आहेत.

येथील जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. घरात सर्वांनाच वाचनाची आवड असल्याने मी ही वाचत असते. विशेषत: महिलांच्या संदर्भातील वाचन जास्त करीत असल्याने मला महिलांच्या सन्मानासाठी हा उपक्रम हाती घ्यावासा वाटल्याचे ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले.

मुलगी लग्न झाल्यावर सासरी गेली व सणानिमित्त माहेरी आल्यानंतर आपल्या नावाची नेमप्लेट पाहण्यास मिळाल्यानंतर एक वेगळाच आनंद तिला व तिच्या कुटुंबीयांना मिळत आहे. गावा-गावांतील युवतींनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. मुलींचा सन्मान करण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हा परिषद गटात मुलींच्या नावाच्या नेमप्लेट दरवाजांवर लावून समाजात स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी एक वेगळीच मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षाही बांदल यांनी व्यक्त केली.

या गटातील दहिवडी २५२, भांबर्डे ५८४, डिंग्रजवाडी ३२०, तळेगाव ढमढेरे ४५०, करंजावणे ३५६, दरेकरवाडी ३३०, निमगाव म्हाळुंगी ५८५, पारोडी ४३०, रांजणगाव सांडस ३८०, टाकळी भीमा ४८२, विठ्ठलवाडी ४३३, उरळगाव ३८०, आलेगाव पागा ४५८, धानोरे ३४८ अशा ७८८ घरांच्या दरवाजांवर नेमप्लेट बसविण्यात आल्या आहेत.