एनसीसीच्या परेडदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई: माटुंगा येथील डी. जी. रुपारेल कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीचा एनसीसीच्या परेडदरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. प्रणाली हिरे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती रुपारेल कॉलेजच्या एफवायबीएससी आयटी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होती. प्रणालीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याने अपमृत्यूची नोंद केली आहे.

माहितीनुसार ,प्रणाली हिरे ही टिटवाळा येथे राहत होती. रविवारी नेहमीप्रमाणे एनसीसीच्या सरावासाठी ती कॉलेजात सकाळीच आली होती. यावेळी सराव करीत असतानाच ती अचानक जमिनीवर कोसळली. प्रणालीला चक्कर आल्याने तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु, त्यानंतरही ती शुध्दीवर न आल्याने सुरक्षा रक्षकांनी तिला जवळच्या खासगी रूग्णालयात नेले. मात्र, खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रणालीला तपासून तिला तातडीने परळच्या के.ई.एम. रुग्णालयात हलविण्यास सांगितले.

त्यानंतर कॉलेजातील शिक्षकांनी के.ई.एम रुग्णालयात धाव घेतली, परंतु प्रणालीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे के.ई.एम.च्या डॉक्टरांनी जाहीर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहितीव पोलिसांनी दिली.