‘हॉटेलबाहेर रांगेत उभे राहता, मग राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात हरकत काय ? : गौतम गंभीर

मुंबई : भारतीय संघातील क्रिकेटपटू गौतम गंभीरने राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यासाठी हळहळ व्यक्त करणाऱ्यांना चांगलाच टोला लगावला आहे. हॉटेलच्या रांगेत अर्धा तास ताटकळत उभे राहता मग राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभं राहणं जड का जातं, असा सवाल त्याने विचारला आहे.

‘एखाद्या क्लबच्या बाहेर २० मिनीटं, आपल्या आवडत्या हॉटेलबाहेर ३० मिनिटं उभं राहून वाट पाहणं चालतं तर राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभं राहणं जड का जातं?’ असं टि्वट त्याने केलं आहे.

देशभक्ती सिद्ध करण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहणं गरजेचं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच स्पष्ट केलं आहे. सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्यासंदर्भातल्या नियमात बदल करता येती का अशी विचारणाही न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. त्यासंदर्भात गंभीर याने हे टि्वट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. या वादात अनेक सेलिब्रिटींनी उडी घेतली असून त्यांच्यामध्ये दोन भाग झाले आहे.

याविषयी अभिनेता कमल हसन यांनी सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. देशभक्ती दाखवण्यासाठी कोणावरही दबाव आणणे किंवा त्यांच्या राष्ट्रभक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले होते. तर अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांनी मात्र राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ थोडावेळ उभे राहण्यास काहीही हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते.