श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

माजी राष्ट्रपती श्री राजपक्षे हे महाराष्ट्र भेटीवर आले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री. राजपक्षे यांनी औरंगाबाद येथील अजंठा व वेरूळ लेण्यांना भेट दिली. या भेटीची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. या लेण्या म्हणजे शिल्पकलेच्या अदभुत नमुना आहेत. या ठिकाणी श्रीलंकेतील नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. त्यांना तेथे पुष्पहार अर्पण करण्याची सोय करावी, अशी विनंती श्री. राजपक्षे यांनी यावेळी केली.

श्री. राजपक्षे यांच्या विनंतीनुसार अजंठा येथे सोय करण्यात येईल, असे सांगून श्रीलंकेने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रगतीने आपण प्रभावित झाल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

श्रीलंकेला दिलेल्या भेटीच्या जुन्या आठवणी यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पर्यटन, गुंतवणूक आदी विषयावर चर्चा झाली.

Facebook Comments