कर्नाटक विजयानंतर आशिष शेलार म्हणाले, भंडारा जिंकू ‘ठोकून’ पालघर जिंकू ‘ठासून’

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर पक्षाचे नेते आक्रमक झालेले दिसत असून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे, भंडारा जिंकू ‘ठोकून’ पालघर जिंकू ‘ठासून’ शेलार यांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवसेनेसारखे नेते चांगलेच डिवचले जाण्याची शक्यता आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात मुख्य लढत ही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेल. राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे तर भाजपाकडून हेमंतकुमार पटले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्या या ट्विटमुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने पालघरमध्ये परस्पर उमेदवारी देऊ केली आहे. तर भाजपाने आयत्यावेळी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना गळाला लावत शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले आहे. ही जागा भाजपाची असल्यामुळे शिवसेनेने निवडणुकीतून माघार घ्यावी, असा इशारा वारंवार भाजपा नेतृत्त्वाकडून देण्यात आला होता. मात्र, शिवसेनेने त्याकडे साफ दुर्लक्ष करत भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत.

इकडे भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याकडून आघाडीच्या उमेदवाराल जिंकवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार मुकाबला होण्याची शक्यता आहे.