टाटा सफारी आणि ट्रकमधे झालेल्या अपघातात ५ विद्यार्थी ठार, चार जखमी

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या चुरमुरा गावात मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच विदयार्थी घटनास्थळावरच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमी हे सर्व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नागपूर-गडचिरोली मार्गावरील चुरमुरा गावाजवळ रात्री ११ च्या सुमारास घडला. मृतांमधे प्रशांत सुधाकर रणदिवे (रा. बल्लारशहा जि.चंद्रपूर), निहाल धनलाल प्रदीते (रा.आमगाव, जि.गोंदिया), प्रणय रमेश गेडाम (रा.आष्टी, जि.गडचिरोली), अंकित वेलादी (रा.कोटी) आणि वैभव पावे (पेंढरी, गडचिरोली) यांचा समावेश आहे. याशिवाय दीपक जयराम निमकर (वणी, जि.यवतमाळ), आकाश तडवी (जळगाव), जूनेद कादरी (करपना, जि.चंद्रपूर) व शुभम मंगरे (गडचिरोली) हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांना चंद्रपूरला हलविल्याची माहिती समोर येत आहे. भरधाव टाटा सफारी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. टाटा सफारीत ९ जण होते व हे सर्वजण कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे म्हटल्या जात आहे.