फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी संजय निरूपम यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : मालाड येथे मनसे कार्यकर्त्यांकडून फेरीवाल्यांना हटविण्याचं आंदोलन सुरू असताना फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणी हल्ला केला.यानंतर या हल्ल्याचं संजय निरूपम यांनी ‘जैसी करनी वैसी भरनी’ म्हणंत समर्थन केलं होतं. शिवाय या ठिकाणी निरूपम यांनी कोणतीही परवानगी न घेता सभा घेतली होती. दरम्यान चिथावणीखोर भाषण देत फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं मालाड पोलिसांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

‘काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, हे ठरवण्याचा मनसेला अधिकार नाही. ज्यावेळी फेरीवाल्यांना मारहाण होत होती, त्यावेळी पोलीस गप्प बसले होते. यापुढेही फेरीवाले असेच करतील’, अशी चिथावणी निरूपम यांनी दिली होती. शिवसेनेला संपविण्यासाठीच भाजप मनसेला मोकळं रान निर्माण करून देत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ‘आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल आणि संघर्ष व्हायलाच हवा. उत्तर देण्याचा अधिकार फेरावाल्यांनाही आहे. २०१४ मध्ये बनलेला फेरीवाला संरक्षण कायदा लागू व्हायला हवा. मात्र अनेक जणांना वाटतं की, तो कायदा लागू होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी बांगड्या भरल्यात आणि सरकार झोपलं आहे’, असं वादग्रस्त विधानही संजय निरूपम यांनी सभेदरम्यान केले होते.