सुट्यांमध्ये खाजगी बसेसने केली दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ

औरंगाबाद : खाजगी बस कंपन्यांकडून बसेसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र, हे भाडेवाढ प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने करण्यात आल्याचे कंपन्यांकडून सांगितले गेले आहे. मात्र, यामुळे उन्हाळाच्या सुट्यांमध्ये खाजगी बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे.

सुट्यांच्या दिवसांत जास्त जास्त प्रमाणात प्रवाशी खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर केला जातो. खाजगी कंपन्या गर्दीचा फायदा घेत अनेक वाहतूकदारांकडून जास्त दर आकारण्याचे काम करतात. परंतु आता खासगी वाहनांना एस. टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी सुट्यांचा हंगाम आणि डिझेल दर वाढल्याचे म्हणत भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र, भाडेवाढ ही ‘एसटी’च्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट राहील, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचा दावा ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून होत आहे.

औरंगाबादेतून नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूरसह विविध शहरांसाठी खाजगी बस धावतात. सोलापूरसाठी ३५० रुपये असलेले भाडे आता ४०० रुपये आकारण्यात येत आहे. तर सोलापूर स्लीपर बससाठी ५५० रुपयांवरून ६३० रुपयांपर्यंत भाडे घेण्यात येत आहे. सुट्यांचे दिवस नसताना नागपूर स्लीपर बसचे भाडे ६३० ते ७५० रुपयांपर्यंत आकारण्यात येते. परंतु सद्य परिस्थितीत खाजगी बसकडून ९५० ते १०५० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. अशाच प्रकारे अन्य मार्गांवरील भाड्यांमध्ये ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची माहिती खाजगी बस कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली.