खरीप पीक कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये -मुख्यमंत्री

चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीत बँकांना सूचक संदेश

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. विनाकारण शेतकऱ्यांना त्रास दिल्याचे लक्षात आल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाईल. उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे, असा स्पष्ट इशारा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते चंद्रपूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत बोलत होते.

या बैठकीला राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर-गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार संजय धोटे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार सुरेश धानोरकर, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील खरीप पिक कर्ज वाटपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. काही बँकांच्या उद्दिष्टांपैकी फारच कमी कर्ज वाटप झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उपस्थित अधिकाऱ्यांना वाटपाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. बँकांकडे मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला असतानाही पात्र शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात कर्ज वाटप झालेले नाही. या हंगामासाठी खरीप कर्ज मिळण्यामध्ये त्यांना अडचणी कशा ? अशी विचारणा त्यांनी केली. जुलै महिना सुरू असतानाही बँकेमधून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे कर्ज वाटपात गती घ्यावी व उद्दिष्टाप्रमाणे कर्ज वाटप व्हावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात कुचराई करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

पीक विमा योजने संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार कमी पैश्याचे धनादेश मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना उचित पद्धतीने पीक विमा मिळावा या संदर्भात नियोजन करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या जिल्ह्यातील उद्दिष्टामध्ये अतिरिक्त पाच हजारांची वाढ करण्याचे नियोजन करा, असे निर्देश त्यांनी दिले.

गोसीखुर्द प्रकल्पातून होत असलेल्या कालव्यामार्फतच्या सिंचनाची स्थिती व उद्दिष्टपूर्ती बद्दलही त्यांनी जाणून घेतले. अनेक ठिकाणी प्रकल्पाची कामे करताना काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये बराच वेळ जात असल्याबाबत तक्रारी राज्यभरातून येत आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया तातडीने मार्गी लागण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मामा तलावाच्या संदर्भामध्ये निधीची कमतरता असेल तर प्रस्ताव पाठविण्याबाबत व जिल्ह्यातील अनेक समस्यांचा कालमर्यादेत निपटारा करण्याबाबतचे निर्देश दिले. जिल्ह्यातील बंद पडलेल्या खाणीबाबत पोलिस विभागाने अधिक दक्षतेने काम करण्याची मागणी भद्रावतीचे आमदार सुरेश धानोरकर यांनी केली. त्यांच्या परिसरातील कर्नाटक एमटा खाणीमधील कोळशाच्या चोरीचा व पुनर्जिवीत करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा पोलिस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेण्याचे निर्देश दिले. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये 13 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला होता. या बैठकीमध्ये दिंडोरा प्रकल्पाच्या संदर्भात देण्यात आलेल्या निर्देशानुसार 34कोटी रुपये मदतीसाठी प्रस्तावित केले असून हा निधी तातडीने वितरीत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज निर्देश दिले. बाबुपेठ, राजूरा, वरोरा नाका उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बदलीनंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर येथील 52 झोपडपट्ट्यांना तातडीने पट्टे वाटप करण्याचे निर्देशही देण्यात आले. चिमूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय देण्याबाबतची कारवाई सुरू असून लवकरच या ठिकाणी अधिकारी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खासदार अशोक नेते यांनी उपस्थित केलेल्या नागभीड येथील शंभर खाटांच्या रुग्णालयाचे लवकर निर्णय घेण्याचे सुचविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येत नसल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच विभागीय तलाठी प्रशिक्षण केंद्रातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावी, असे स्पष्ट केले. काही ठिकाणी दोन वर्षापेक्षा अधिक वेळ होऊनही अधिकारी रुजू झाले नाहीत. त्यांच्याबाबत गंभीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

बदली झाल्यानंतर रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत अधिक गंभीरतेने व तातडीने कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जागांवर अधिकारी रुजू होत नसेल तर त्या प्रकरणासंदर्भात तातडीने तपासणी करून अन्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी व रुजू न होणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची आघाडी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आघाडी घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, दुर्गम भागातील अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची मागणी केली. बैठकीच्या सुरुवातीला डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम, योजना व जनप्रबोधन करण्यात आल्यामुळे वन्यजीव व मानव यातील संघर्ष कमी झाल्याचा लघुपट सादर करण्यात आला.